मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. एकीकडे (Mumbai) तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीचं जागावाटप, दुसरीकडे मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि अशातच आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी राजकारणत खळबळ उडवून देणारे गंभीर आरोप केल्यामुळे महायुती सरकार चांगलंच कोंडीत सापडलं आहे.
या सर्व घडामोडींमध्येच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. अचानक झालेल्या या बैठकीमुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना तुरुंगात पाठवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रचंड दबाव होता असा दावा श्याम मानव यांनी केला आहे.
श्याम मानव यांनी सध्या महायुतीत असणारे अजित पवार यांच्याबाबतही मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटका व्यावसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी मागणी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणांसमोर द्या, असं सांगण्यासाठी देशमुखांवर काही लोकांनी सतत दबाव टाकल्याचा धक्कादायक दावाही श्याम मानव यांनी केला आहे. यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन ते चार प्रतिज्ञापत्र फडणवीसांनी पाठवले होते, असं म्हटलं आहे.
कुणी माझ्या नादी लागला तर सोडत नाही
दरम्यान, या धक्कादायक आरोपांवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख (Mumbai) सातत्याने आरोप करत आहेत, तरीही मी शांत आहे. मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कुणावर डूख ठेवून राहात नाही. मी पक्का आहे, कुणाच्या नादी लागत नाही. मात्र, कुणी माझ्या नादी लागला तर सोडत नाही, असा इशारा फडणवीसांनी देशमुखांना दिला आहे.
मात्र, या सर्व घडामोडी सुरु असतानाच फडवणीसांनी अजितदादांची तडकाफडकी भेट (Mumbai) घेतल्यामुळे आता विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शिवाय विरोधकांनी जुनी प्रकरणं बाहेर काढल्यामुळे त्यावर काय बोलायचं? त्याबाबतची पुढची रणनीती काय आखायची आणि या आरोपांना उत्तर कसं द्यायचं? यासाठी ही भेट झाली का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे तेंव्हाचे सहकारी आणि आताचे विरोधक अनिल देशमुख यांच्या दाव्यावर फडणवीसांच्या भेटीनंतर अजितदादा काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.