मुंबई : गोरेगाव ते कांदिवली दरम्यानची रेल्वे सेवा सुधारण्यासाठी (Mumbai Local) पश्चिम रेल्वेने 27/28 ऑगस्टच्या रात्रीपासून सहावी लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. सहाव्या मार्गिकेचे काम सुरू झाल्याने बुधवारी रात्री प्रवाशांना घरी पोहोचताना अडचणी येऊ शकतात. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, लाईन टाकण्याच्या कामामुळे 28/29 ऑगस्टच्या रात्री पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री 11 ते पहाटे 4.00 वाजेपर्यंत राहील.
ब्लॉक दरम्यान 28 ऑगस्टच्या रात्री चर्चगेट-बोरिवली, विरार-अंधेरी, अंधेरी-नालासोपारा आणि भाईंदर-चर्चगेट या 22 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. चार लोकल सेवा अल्पावधीत बंद करण्यात आल्या आहेत.
140 लोकल गाड्या रद्द
प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हे काम पूर्ण करण्यासाठी केवळ शनिवार आणि रविवारीच मोठे ब्लॉक घेण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या कालावधीत, 100 ते 140 लोकल सेवा रद्द केल्या जातील, तर 40 सेवा अल्प कालावधीत बंद होतील.
35 दिवसांत काम पूर्ण होईल
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सुमारे 4.5 किमी लांबीची (Mumbai Local) सहावी लाईन टाकण्यात येणार आहे. हे काम 5/6 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कामासाठी शनिवारी/रविवारी रात्री 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 35 दिवसांत लाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव काळात कोणतेही काम केले जाणार नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल ट्रेन सेवेची क्षमता वाढणार आहे.