सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट येथे बांधलेला (Sindhudurg) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावर अनेक स्तरातून सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर लेखक चंदन विचारे यांनी लिहिलेला डोळ्यात अंजन घालणारा लेख नक्की वाचा..
माझ्या जीवाभावाच्या सवंगड्यानो, मावळ्यांनो आज तुमची खूप आठवण येत आहे. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून प्राणपणाने तुम्ही हे गडकोट लढवले. प्रसंगी हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या या महायज्ञात तुम्ही समिधा होऊन स्वतःची आहुती दिलीत. स्वराज्याचा संसार थाटण्यासाठी तुम्ही एका हाती तुळशीपत्र आणि दुसऱ्या हाती निखारा घेऊन मला जणू विचारत होतात कि, सांगा राजं यातलं आमच्या घरादारावर नेमकं काय ठेऊ? तुमच्यासारखी जिवाभावाची, जीवाला जीव लावणारी, माझ्यासाठी, स्वराज्यासाठी जीव घेणारी अन लढता लढता हसत जीव देणारी माणसं होती म्हणून आणि म्हणूनच सह्याद्रीसुद्धा तुमचा पाठीराखा झाला.अन्यथा या सह्याद्रीत पाय ठेवण्याची कुणाची काय मजाल. हे दिव्य पार पाडावं ते केवळ वाघ, वारा अन माझ्या लढवय्या मरहट्ट्यानीच.
बाजी तुम्ही, बांदल वीर अन असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी गजापूरची घोडखिंड तुमच्या रक्ताने पावन केलीत. माझ्या तान्ह्याने तर त्याच्या लाडक्या लेकाचे, रायबाचे लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणत कोंढाणा स्वराज्यात परत आणला पण पण या कामगिरीत मी माझा सिंह मात्र कायमचा गमावला. माझ्या एका पत्राने पेटून उठत प्रतापराव त्यांच्या मोजक्याच सहकाऱ्यांसमवेत बेहलोल खान आणि त्याच्या सैन्यावर तुटून पडले. माझा शिवा काशीद तो तर चक्क शिवाजी होऊनच गेला. नेताजी, येसाजी, मुरारबाजी, हिरोजी, हंबीरराव किती अन कुणाकुणाची नावं घ्यावी. तुमची नुसती नावे ओठी आली तरी डोळ्यांच्या कडा पाणावतात.
रायगडावर हिंदवी स्वराज्याच्या, बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनावर (Sindhudurg) छत्रपती होऊन मी बसलो खरा पण त्या सिंहासनापर्यंत मला घेऊन जाणारी एक एक पायरी तुम्ही होतात. श्रींचे हे स्वप्न तुमच्यामुळेच तर आकाराला आले.
आज या साऱ्याचं सिंहावलोकन करण्यास कारण कि, नुकतीच राजकोट, मालवण येथे चक्क माझ्याच पुतळ्याबाबत घडलेली दुर्दैवी घटना. जिथे माझ्या पुतळ्याची अवघ्या आठ महिन्यात झालेली हि अवस्था तिथे ऊन, वारा, पावसाचे, लाटांचे असंख्य तडाखे सोसत साडेतीनशे वर्षांपासून उभे असलेल्या आपल्या गडकोटांची काय गत.
मी सारं सारं पाहतोय. कुठल्या तोंडाने सांगू आबा अन आऊसाहेबांना? काय वाटेल त्यांना. कसली भव्यदिव्य स्वप्नं होती त्यांची या स्वराज्याप्रती अन आज त्याची काय हि अवस्था ? कुठे ते खांद्याला खांदा लावून एका भगव्याखाली स्वराज्यासाठी लढलेले अठरा पगड जातीतले मावळे अन कुठे आताचे जातीपतीत विभागून गेलेले?
अनेक वर्ष उपेक्षित असलेल्या गडकोटांकडे कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संवर्धकांची पाऊले वळली. पदरमोड करून प्रत्येकाने त्यांच्या पूर्वजांनी लढवलेल्या, प्राणपणाने जपलेल्या या गडकोटांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला खरा पण कालांतराने अंतर्गत राजकारण आणि राजकारण्यांमुळे दुर्गसंवर्धनासारख्या पवित्र कार्याचासुद्धा आज खेळखंडोबा होऊन बसलाय. राजकारणाच्या या वाळवीने हे क्षेत्रसुद्धा पोखरायचे सोडले नाही.
स्वभाषा, स्वधर्म, स्वराज्य, स्वाभिमान याची किंचितशी देखील चाड नसणारे आज माझ्याच नावाने मतांची भिक मागत फिरत आहेत, माझ्या नावाखाली निवडणुका लढवत आहेत. रयतेच्या काडीलाही धक्का लावू नका असं माझ्या सैन्याला उद्देशून लिहिलेलं पत्र यांनी चक्क बासनात गुंडाळून ठेवलं. कमिशनच्या चिरीमिरीसाठी यांनी आता फक्त राज्यच विकायचं तेवढं बाकी ठेवलं असं वाटतं. कंत्राटं काढणं आणि जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे त्यातून निर्लज्जपणे कमिशन मागणं हे आता जणू आद्यकर्तव्यच होऊन बसलंय काहींच. भ्रष्टाचार जणू यांच्या जीवनाचा, कामाचा भाग होऊन बसलाय. हे हे असं किती अन कुठवर सहन करायचं ?
काल राजकोटवर घडलेला प्रसंग तर आणखी चीड आणणारा.आरोप -प्रत्यारोप, काय ती बेताल वक्तव्ये, काय ती पातळी सोडलेली भाषा, स्वकियांनीच स्वकियांवर उगारलेले हात, एकमेकांना केली गेलेली शिवीगाळ, अडवलेल्या वाटा.
मध्यन्तरी आमच्यावर एक मालिका आली होती ज्यात आऊसाहेबांच्या ओठीचा एक संवाद संवादलेखकाने अतिशय छान लिहिला होता. (Sindhudurg)
‘हे हे सुलतान आपआपसात लढतात अन मरतात मात्र मराठे.’
काल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उडालेली राजकीय चकमक पाहिली अन आम्हाला चटकन ते आठवलं.
राजकारण्यांच्या घाणेरड्या राजकारणात भरडली जाते आमची रयत. पण त्याचे कुणालाच सोयर सुतक नाही. म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावत जातो तो हा असा.
बेताल वक्तव्ये करणारे राजकीय पुढारी, फरार गुन्हेगार, अत्याचारी, लाचखाऊ भ्रष्टाचारी कुणाकुणाचा म्हणून कडेलोट अन चौरंगा करायचा? यांची मोजदाद करायची म्हटली तर माझ्या साडेतीनशे गटकोटांवर भल्यामोठया रांगाच लागतील.
हे सर्व पाहिलं कि, राहून राहून एकच प्रश्न पडतो.
याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा?
गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना पहिल्यानंतर आज महाराजांना हे असंच वाटत असावं हो ना? – ©चंदन विचारे.