हिंदकेसरी : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड बाबत मोठी बातमी (Santosh Deshmukh Murder) समोर आली आहे. महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप होत असताना आज त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो समोर आल्यानंतर देवगिरी बंगल्यावर तातडीची बैठक झाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही देवगिरी बंगल्यावर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे उपस्थित होते. बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास स्पष्ट सांगितले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी राजीनामा दिला.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मी तो स्वीकारून राज्यपालांकडे पाठवला आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासूनच स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र, धनंजय (Santosh Deshmukh Murder) मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप आहेत. या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड असल्याचे सीआयडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. ही हत्या खंडणीसाठी केल्याचेही सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे.