रांची : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आहे. आरक्षण केवळ जातीनिहाय असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशीच समस्या रांची येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील एका विद्यार्थिनीने ट्विटच्या माध्यमातून मांडली. त्या ट्विटचे अनेकांनी समर्थन केले असून पुन्हा एकदा जातीनिहाय आणि आर्थिक आरक्षणाचा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे.
रांची येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची विद्यार्थिनी राशी पांडे हिने हे ट्विट केले आहे. यामध्ये तिने म्हंटले आहे, कि मी सामान्य श्रेणीचा विद्यार्थीनी आहे. माझ्या पूर्वजांनी मला शून्य एकर जमीन दिली असून मी भाड्याच्या घरात राहते. मी 97% गुण मिळवूनही मला कुठेही प्रवेश मिळाला नाही. पण माझ्या वर्गमित्राला 60% गुण मिळूनही तसेच त्याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली असून देखील त्याला प्रवेश मिळाला आहे. आणि तुम्ही मला विचारता, की मला आरक्षणाची समस्या का आहे?
हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले असून सोशल मीडियावर वाद-विवाद सुरु झाला आहे. एका वापरकर्त्याने या ट्विटला दुजोरा देत म्हंटले आहे, कि ”ज्या दिवशी सामान्य श्रेणीतील लोक जातिव्यवस्था रद्द करण्यास सुरुवात करतील त्या दिवसापासून अनुसूचित जाती/जमाती आणि ओबीसी वर्गातले लोक आरक्षण रद्द करण्यास पुढाकार घेतील.”
पुढे आणखी एका वापरकर्त्याने सुचवले आहे, कि “सरकारी फायदे आणि आरक्षण कुटुंबाच्या एकूण उत्पन्नावर आधारित असावे. जात आणि धर्मावर आधारित नसावे.”
तर तिसऱ्या वापरकर्त्याने म्हंटले आहे, कि “हि परिस्थिती खूप निराशाजनक आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, मग तो प्रवेश असो, नोकरीसाठी अर्ज असो किंवा नोकरीत बढती असो, आपल्याला या समस्येचा सामना करावा लागतो.”
तर एकाने राशी हिला आपल्या ट्विटचा पुर्नविचार करण्यास सांगितले आहे. त्यात त्याने म्हंटले आहे, कि तुम्हाला काही विशेषधिकार आहेत. जे तुला आता समजणार नाहीत. तू जस जसे पुढे जाशील तुझ्या लक्षात येईल कि तुझ्या मित्राला अशा परिस्थितून पुढे जावे लागते ज्याची भरपाई शिक्षण आणि पैशातून होत नाही.
तर दुसरीकडे लिंगनिहाय आरक्षणावर मत मांडताना एकाने महिला आणि पुरुष आरक्षणावर देखील प्रश्न उपस्थित केला.