पहले शौचालय फिर देवालय या घोषणेने नरेंद्र मोदींनी आपल्या राष्ट्रीय राजकारणाची सुरुवात केली. या घोषणेमुळे स्वतःला कट्टर हिंदूत्ववादी म्हणवून घेणार्यांनी नरेद्र मोदींवर टिका केली होती. देवालय या शब्दाचा अर्थ राम मंदिर होता… राम मंदिरासाठीचा हा लढा खूप जुना आहे. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती या लढ्यासाठी दिली आहे. आयोद्धेहून गुजरातमध्ये परतणार्या निष्पाप रामभक्तांना जीवंत जाळण्यात आलं होतं.
आधुनिक काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने हा लढा राष्ट्रीय पातळीवर सुरु ठेवला. आता या लढ्याला राज्यात (युपी) आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना यश प्राप्त झाले आहे. कोर्टाने आदेश देऊनही राजीव गांधींनी एका समाजाची मते मिळवण्यासातठी माता शहाबानो यांना न्याय मिळवून दिला नाही, त्यांच्यावर अन्याय केला. पण ती चूक या सरकारने केली नाही व कोर्टाच्या आदेशानुसार कोणाचेही लांगुलचालन न करता राम मंदिर उभरण्याची सज्जता व तत्परता दाखवली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगळेच राजकारण शिजायला लागले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जाणता राजा म्हणून प्रचलित असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राम मंदिराचा संबंध कोरोनाशी लावला आहे. मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही असा त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. तर सत्तेत त्यांचे भागीदार असलेल्या शिवसेनेला राम मंदिर निर्माणामध्ये श्रेय हवे आहे. हे श्रेय मिळवण्यासाठी सध्या त्यांची धडपड सुरु आहे.
राम मंदिर, कोरोना आणि श्रेय या विषयाचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. सर्वात आधी आपण श्रेयवादाचा विचार करुया… स्वातंत्र्य काळात केवळ महात्मा गांधी हे एकमेव नेते होऊन गेले… फक्त आणि फक्त महात्माजींमुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे असे कॉंग्रेसला वाटते. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी असे मत अनेकदा व्यक्त केले आहे. सावरकरांवर टिका करताना आम्ही अहिंसेने स्वातंत्र्य मिळवले असे ते अभिमानाने सांगतात.
दे दी हमे आझादी बिना खडग बिना ढाल अशी प्रेमगीते कॉंग्रेसजनांनी रचली आहेत. पण सावरकरांना जेव्हा विचारण्यात आलं की स्वातंत्र्य कुणामुळे मिळालं तर सावरकर म्हणाले सशस्त्र क्रांतिकारकांमुळे, इतकेच नव्हे तर अहिंसक मार्गाने लढा देणार्यांमुळे इतकेच नव्हे तर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देवापुढे एक फुल जरी कुणी अर्पण केले असेल तर त्याच्यामुळे सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना श्रेय हवे आहे.
परंतु धारावीमध्ये कोरोनाची लढाई बीएमसीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जिंकली हे उद्धवजींना जाहीर करता आले नाही. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही. उलट त्यांचे समर्थक संघाची अवहेलना करण्यात मग्न होते. पण राम मंदिरात न केलेल्या कामाचे श्रेय मात्र त्यांना हवे आहे. बाळासाहेब ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन आपल्या संघटनेचे नाव ठेवले आहे.
या अर्थाने शिवरायांच्या तत्वावर त्यांची संघटना चालते व शिवसैनिक म्हणजे केवळ त्या संघटनेचे कार्यकर्ते नव्हे तर थेट छपत्रपती शिवरायांच्या तत्वांचे सैनिक असा अर्थ होतो. बाळासाहेबांनी सावरकरांचं आधुनिक हिंदुत्व स्वीकरलं होतं. वर सावरकारांचे स्वातंत्र्यप्राप्तीचे मत दिले आहे. इतका त्याग आणि पराकोटीची हाल अपेष्ठा आणि अवहेलना स्वीकारुनही सावरकर स्वातंत्र्यप्राप्तीचे श्रेय सबंध जनतेला देतात. उद्धवराव आणि त्यांच्या समर्थकांनी हा आदर्श घेतला पाहिजे. श्रेय मिळवण्यापेक्षा कार्य करणे कधीही श्रेयस्कर. जनता जागृत असते, तुम्ही कार्य केले तर त्याचे श्रेय तुम्हाला मिळतेच मिळते. त्यामुळे उद्धवजींनी श्रेयाचे राजकारण न करता एक सामान्य भक्त म्हणून आयोद्धेला जाऊन या लढ्यात जे सहभागी झाले, हुतात्मा झाले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. असे केल्याने लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण होईल आणि ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
आता पवार साहेबांच्या विधानाचा विचार करुया. शरद पवार हे कॉंग्रेस संस्कृतीत मोठे झालेले नेते आहेत आणि कॉंग्रेसचा राम मंदिराला सुरुतीपासून विरोध होता. राम हे काल्पनिक पात्र आहे असे कॉंग्रेसचे स्पष्ट मत आहे आणि ते मत त्यांनी कोर्टामध्ये मांडलेले आहे. कॉंग्रेसचं म्हणणं असं आहे की ती बाबरी मशिदीची जागा असून मुसलमान बांधवांना ती देण्यात यावी. कॉंग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दानशूर राहिलेला आहे. ते इतके दानशूर आहेत की त्यांनी भारतमातेचे तुकडे करुन तिचा एक भाग पाकीस्तान म्हणून देऊन टाकला…
शिवाजी महारांजांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना धुडकावून लावून कॉंग्रेसने नवा राष्ट्रवाद निर्माण करण्याचा अट्टाहास धरला. त्याचे फळ इथल्या नागरिकांना भोगावे लागलेले आहे. कॉंग्रेसचा हा दानशूरपणा भारतासाठी दूर्भाग्य ठरला आहे. केवळ एका समाजाला खुश करण्यासाठी कॉंग्रेसला अशा गोष्टी कराव्या लागल्या आहेत. हिं
दू दहशतवाद, भगवा दहशतवाद ही कॉंग्रेसने मांडलेली थियरी आहे. हा देश आज जीवंत आहे तो हिंदूंच्या पराक्रमावर आणि सहिष्णूतेवर जीवंत आहे हे कॉंग्रेसला माहिती असूनही आणि आपली नव्या राष्ट्रवादाची थियरी पूर्णपणे फोल ठरली आहे हे लक्षात येऊनही कॉंग्रेसने खोट्या सेक्युलरवादाचा प्रचार सुरु ठेवला. शरद पवार साहेब हे त्याच संस्कृतीतून आलेले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात प्रचलित असलेले सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. त्यांच्या पिढीतले अनेक नेते आता सक्रीय नाहीत. या वयातही शरद पवार जोमाने काम करत आहेत.
त्यांच्या मुलाच्या वयाचे आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सहसा घराचा उंबरठा ओलांडत नसले तरी शरद पवार साहेब पावसात भिजण्यापासून ते कोरोनाच्या काळात पाहाणी करण्यापर्यंत काम करत आहेत. किमान आपल्याला तसे दिसत तरी आहे.
पवार साहेबांचे मत असे आहे की मंदिर बांधण्यापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे. पवार साहेबांनी मोठमोठी पदे उपभोगली आहेत. सरकार कसे चालते हे अनुभवी शरद पवारांना नक्कीच माहित आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारची वेगळी तरतूद असते. चीनसोबत युद्धजन्य वातावरण निर्माण झालं तेव्हा काही लोक टिका करत होते की देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून केंद्र सरकार राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करत आहेत.
हे सोशल मीडियावरचे शेरलॉक होल्म्स आहेत. शेरलॉक सुद्धा यांच्यासमोर मार खाईल. सैन्य, वैद्यकीय इ. गोष्टींसाठी सरकारची वेगळी तरतुद असते. सरकारने हे करण्यापेक्षा ते करावं असं म्हणणं अतिशय बालीशपणाचं आहे.
मुद्दा राम मंदिर आणि कोरोना आहे… तर भारत सरकारने कोरोनावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवलेले आहे आणि पवार साहेब कोरोनाविषयीचा सल्ला मोदीजींना देत आहेत परंतु देशात कोरोनाबाधितांमध्ये आपल्या महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. शासनाच्या अनागोंदी कारभाराच्या बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत.
याविषयी या सरकारचे पितामह शरद पवार साहेबांनी कोणती पावले उचलली आहेत आणि सरकारला त्यांनी कोणत्या प्रकारचे सल्ले दिले आहेत. कारण नरेंद्र मोदींनी जरी त्यांचे सल्ले ऐकले नाहीत तरी आपले मुख्यमंत्री त्यांचे सल्ले नक्कीच ऐकू शकतात. शरद पवारांच्या अनुभवाचा उपयोग महाराष्ट्राला होऊ शकतो. पण त्यांच्या अनुभवाचा उपयोग सबंध भारताला व्हावा म्हणून ते महाराष्ट्राकडे दुलर्क्ष करीत आहेत असे वाटते.
आता तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हाव्हा यासाठी जे विरोधीपक्ष नेते झटत आहेत, दौरे करत आहेत त्यावर सुद्धा सरकारने बंदी घातल्याची बातमी समोर आलेली आहे. आपण काम करायचे नाही आणि दुसर्याला काम करु द्यायचे नाही हे नवीन धोरण आता तयार होत आहे. ही गोष्ट खूपच गंभीर आहे आणि याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला भोगावा लागणार आहे.
आता मुद्दा श्रीराम मंदिराचा… मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे अशी टिका करणार्यांना हे उत्तर आहे. तरी त्यांची बुद्धी ठिकाणावर येणार नाही. श्रीरामाचरणी त्यांच्या बुद्धीसाठी आपण प्रार्थना करु शकतो. श्रीराम मंदिर हे केवळ एक मंदिर किंवा वैयक्तिक श्रद्धास्थान नसून ते राष्ट्रीय श्रद्धास्थान आहे. कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबईवर हल्ला केल्यानंर कॉंग्रेसने व आपले उच्चशिक्षित पंतप्रधान माननीय मनमोहन सिंह यांनी पाकीस्थानला आपल्या सिंह या नावाला जागून जाब विचारला नाही किंवा या हल्ल्याचा सूड घेतला नाही. पण मोदींच्या काळात मात्र आपण सर्जिकल स्ट्राईक केलं, एअर स्ट्राईक केलं.. राष्ट्रीय सूड घ्यायची परंपरा आपण पुनर्स्थापित केली…
संगीत उत्तरक्रिया या नावाचे सावरकरांचे एक नाटक आहे. त्यात पानीपतचा सूड मराठ्यांनी घ्यावा अशी ऱचना या नाटकाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे आणि स्वराज्याची जी हानी झाली त्याचा सूड म्हणून अफखलखानाचा वध केला. सीता ही केवळ रामाची पत्नी नव्हती तर ती आयोद्धेची होणारी महाराणी होती व सबंध स्त्रीजातीची प्रतिनिधी होती म्हणून श्रीरामचंद्रांनी रावणाला मारुन सूड घेतला… कृष्णाने सुद्धा आपल्या मामाला, कंसाला मारुन सूड घेतला… ही आपली राष्ट्रीय परंपरा आहे.
श्रीराम मंदिर उभारणे म्हणजे जगातल्या सगळ्या आतंकवाद्यांना हा संदेश देणे आहे की आम्ही तुम्हाला मुळीच घाबरत नाही… आम्ही शिवाजी-संभाजी रक्तगटातले आहोत. अरबस्थानातून आलेल्या अतिरेकी राजवटींनी इथली अनेक मंदिरे पाडली, इथली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला…. पण राम आणि कृष्ण हा भारताचा आत्मा असल्यामुळे आपली संस्कृती नष्ट होऊ शकली नाही.
उलट आज जगाला या संस्कृतीने भूरळ घातली आहे. ५ तारखेला श्रीराम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. एका आतंकवाद्याने हे मंदिर पाडले होते आणि आता हे मंदिर आपण पुन्हा उभारतोय… हे मंदिर जेव्हा निर्माण होईल तेव्हा जग आपल्याला घाबरुन राहिल. कुणाची आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. एकेकाळी आपल्यावर विजय मिळवलेल्या चीननेही माघार घेतली आहे. हेच प्रभू श्रीरामांच तत्व आहे. एखादी गोष्ट पटली नाही तर आपण म्हणतो की आता यात काही “राम” उरला नाही. रामाचे महत्व धार्मिकदृष्ट्या, अध्यात्मिकदृष्ट्या तर आहेच परंतु राष्ट्रीयदृष्ट्याही रामाला खूप महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे पाकीस्थानच्या निर्मितीचे प्रायश्चित होणार आहे आणि पाकीस्थानलाही यामुळे धडकी बसणार आहे. असे म्हणतात की महात्मा गांधींना रामराज्य हवे होते. तर ते रामराज्य आता स्थापित झाले आहे आणि लवकरच रामाचे मंदिर म्हणजेच त्याचे सिंहासन सज्ज होणार आहे. ज्याप्रमाणे भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आयोद्ध्येवर राज्य केले.
त्याचप्रमाणे मनात रामाच्या पादुका ठेवून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य करीत आहेत. श्रीराम मंदिरामुळे कोरोना व्हायरस जाईल की नाही हा चर्चेचा विषय मुळीच नाही. पण भारताकडे वाकड्या नजरेने पाहणारे व भारताचे वाईट चिंतणारे व्हायरस मात्र श्रीराम मंदिरामुळे नाहिसे होतील. राष्ट्रीय हित चिंतणार्या प्रत्येकाला मानसिक बळ मिळणार आहे. कारण श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
writerjayeshmestry@gmail.com