ऑलिम्पिकच्या तक्त्यावर प्रथमच कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब उर्फ के. डी. जाधव यांनी कुस्तीतले कांस्यपदक जिंकून स्वतंत्र भारताचे नाव कोरले. १९४८ आणि १९५२ च्या ऑलिम्पिक खेळात फ्रीस्टाइल कुस्तीत खाशाबा जाधव यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यात एक इतिहास घडविला होता. भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. १९४८ सालातील लंडन मधील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या काही मिनिटांतच ऑस्ट्रेलियन मल्लाला चीतपट करून प्रेक्षकांना त्यांनी अचंबित केले. आणि फ्लायवेट गटात सहावे स्थान मिळविले. ऑलिंपिकमध्ये १९४८ पर्यंत इतक्या वरचा क्रमांक मिळविणारे ते पहिले भारतीय क्रीडापटू ठरले. मॅटवरची कुस्ती माहीत नसताना त्यांनी मॅटवर हे यश मिळवले हे विशेष ! सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागूनही निराश न होता खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली. हेलसिंकीमध्ये २४ देशांतील मल्लानी भाग घेतला होता. २३ जुलै, १९५२ रोजी हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले.
खाशाबा जाधव यांचे बालपण
यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी कराड तालुक्यातील गोळेश्र्वर या छोट्या खेड्यात झाला. हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. दादासाहेब जाधव हे खाशाबांचे वडील ख्यातनाम पैलवान होते. त्यांच्या मुलांपैकी सर्वात लहान ५ क्रमांकाचा मुलगा म्हणजे खाशाबा जाधव. त्यांचे आजोबा नानासाहेब हे उत्तम कुस्तीपटू होते त्यामुळे घरातील वातावरण कुस्तीमय होते.
वयाच्या 5 व्या वर्षी त्यांनी कुस्तीच्या युक्त्या शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी कुस्तीबरोबर भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग), जलतरण, धावणे, जिम्नॅस्टिक, मल्लखांब या खेळांतही शालेय जीवनातच यश मिळविले होते. यांनी लहानपणीच त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला २ मिनिटांत लोळवले होते. खाशाबांचे शालेय शिक्षण १९४०-४७ या दरम्यान कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये झाले.
त्यानंतर उर्वरित जीवन कुस्तीकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले. त्यांचे वडील दादासाहेब जाधव कुस्ती खेळाचे वस्ताद असल्यामुळे त्यांना वयाच्या ५ व्या वर्षापासून कुस्तीच्या डावपेचांचे बाळकडू मिळत होते. महाविद्यालयात त्यांना बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत. शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्याची कुस्ती त्यांना कधीही आडवी आली नाही.
जाधव यांचे त्यानंतरचे आयुष्य
कांस्यपदक जिकून भारतात आल्यानंतर खाशाबा जाधव यांचे असे काही जंगी स्वागत कधीही विसरणार नाहीत असे होते. जाधव यांच्या स्वागतासाठी गावातील लोक १५१ बैलगाड्या घेऊन कराड स्थानकात पोहोचले. ढोल-ताशांच्या गजरांनी आलेल्या लोकांनी नृत्य, गायन करत आपल्या गावात आनंदात घेवून गेले. गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण लोकांच्या गर्दीने व्यापला होता.
हे अंतर पायी चालावयाचे झाले तरी १५ मिनिटांचे आहे पण हेच अंतर पार करण्यासाठी विनातक्रार सात तास लागले. साताऱ्याच्या एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेले गोळेश्वर गाव भारताच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले. भारत देशाला प्रथमच ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणारे गोळेश्वर हे गाव जगभर प्रसिद्ध झाले. त्यानंतर सन १९५५मध्ये ते सब-इन्स्पेक्टर पदावर महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी सहभाग घेवून अनेक कुस्त्या जिंकल्या. पोलिस सेवेत जाधव यांनी खेळाडूंना राष्ट्रीय खेळांचे प्रशिक्षण दिले. जाधव यांनी 30 वर्षे महाराष्ट्र पोलिसांची सेवाही दिल्यानंतर असिस्टंट पोलीस कमिशनर या पदावरून निवृत्त झाले. खाशाबा जाधव यांचा सन १९८४ मध्ये एका अपघातात दुर्दैवी अंत झाला.
प्रथमच ऑलिंपिक मध्ये खाशाबा यांनी वैयक्तिक पदक जिंकले आणि भारताच्या सन्मानात भर घातली. भारतामध्ये ज्या काळात तुटपुंज्या क्रीडा सुविधा होत्या, खेळांना कोणतेही प्रोत्साहन नव्हते त्या काळात एका भारतीय खेळाडूने ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणे ही सोपी गोष्ट नव्हती. कोणतीही सुविधा नसताना तसेच परदेशात जाण्यासाठी कसातरी पै-पैसा जमवून खाशाबा तेथे पोहोचले.
खाशाबा जाधव यांनी स्वत:च्या हिमतीवर, स्वबळावर आणि स्वखर्चावर प्रतिकूल काळात ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यामुळे आपल्या भारताचे नाव उंचावले, त्यांचा हा भीमपराक्रम कित्येक वर्षे अबाधित राहिला. त्यांचा हा पराक्रम कित्येक वर्षे दुर्लक्षून सरकारने त्यांचा सन्मान योग्य वेळी केला नाही. मृत्यूनंतर खाशाबा यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान , शिवछत्रपती पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार हे दोन प्रमुख पुरस्कार मिळाले. सन २०१० मध्ये दिल्लीमधील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील कुस्ती विभागाला आदरयुक्त भावनेने त्यांचे नाव दिले गेले. पद्म पुरस्कार न मिळालेले ते एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता आहेत. त्यांच्या आयुष्यावर क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे.