हिंदकेसरी न्यूज : पुण्यात एका अल्पवयीन मुलीने दारूच्या नशेत चक्क गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच तिच्या सोबत असणारी मैत्रीण बेशुद्ध अवस्थेत सापडली आहे. या मुली अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या असून ही घटना येरवडा येथे घडली आहे. विद्येचे माहेरघर म्हणून प्रचलित असलेले पुणे पुन्हा एकदा अशा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने गुन्हेगारी आणि व्यसनाकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तनिषा शांताराम मनोरे (वय 16) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. येरवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तनिषा ही येरवड्यातील लक्ष्मीनगर कॉलनीत राहात होती. ती पुण्यातील एका महाविद्यालयात इयत्ता 11 वीत शिकत होती (पुणे क्राईम न्यूज) तिची आई भाजीविक्रीचा व्यवसाय करते. ती आणि एक मुलगा चांगले मित्र होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे ती सतत काळजीत असायची. सोमवारी (15 जुलै) सायंकाळी तिने दोन मैत्रिणींना घरी बोलावले. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तिची आई घरी येणार नाही, हे सर्वांनाच माहीत होते. तनिषाने तिच्या एका मैत्रिणीला दारू आणायला सांगितली. तिने वाईन शॉपमधून दारू आणली.
त्यानंतर तिघांनी घरात दारू पार्टी सुरू केली. तिघेही भरपूर प्यायले. त्यानंतर मुलगी आणि मुलगा दारूच्या नशेत झोपले होते. तनिषा जागीच होती. तिने मद्यधुंद अवस्थेत गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री आठच्या सुमारास झोपलेल्या एका मित्राला जाग आली त्यावेळी त्याने तनिषाने गळफास घेतल्याचे पाहिले. त्याने तनिषाला खाली घेतले. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्याने शुद्धीवर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, त्याने तिच्या आईला फोन करून ही माहिती दिली. आई, मुलगा व इतर नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने तिला रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
यावेळी दुसरी मुलगी घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला शुद्धीवर आणले. त्यानंतर ती दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले. याबाबत तिच्या पालकांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
पोलीस तपासात तनिषा आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, दारूच्या पार्टीनंतर तिला उलट्या झाल्या. पार्टीत दोन्ही मुली मद्यधुंद अवस्थेत होत्या. यामुळे एक मुलगी बेशुद्ध पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या अल्पवयीन मुलींनी दारू कशी मिळवली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तिच्या एका मित्राने दारू आणली होती. त्याच्या जबाब नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे, असे वरिष्ठ निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी सांगितले.