Annabhau Sathe : सांगलीतील वाटेगाव हे लहानसे गाव. या गावातील भाऊराव आणि वालुबाई यांच्या (Annabhau Sathe) पोटी जन्मलेल्या आणि केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या मुलाने थेट रशियात आपला ठसा उमटवला. एवढेच नव्हे तर आज त्याचा पुतळा रशियाला त्यांच्या लढाईची आणि जगण्याची प्रेरणा देत आहे. महाराष्ट्रात या मुलाने क्रांती केलीच आणि हा महाराष्ट्राचा वारसा घेऊन गेलेल्या या मुलाने रशियात ठणकावून सांगितले; की ”मी 3.5 कोटी लोकांची मराठी भाषा बोलतो”. हे ऐकून तुमच्याही मनात कुतूहल निर्माण झाले असेलच. तर कोण आहे हा तरुण? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात तुकारामाचे साहित्य गाजले; आणि या साहित्याने रशियालाही भुरळ पाडली. तर हे नाव आहे तुकाराम भाऊराव साठे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवस शाळेत गेले, नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. इथूनच सुरुवात झाली वंचितांच्या, शोषितांच्या जगण्याला न्याय मिळवण्याची! अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे अण्णा भाऊ साठे यांचे काम अतिशय महत्त्वपूर्ण ठरले.
अण्णाभाऊ यांची छाप महाराष्ट्रात तर पडलीच पण दूरवर वसलेल्या रशियात हे नाव गाजेल अशी कोणी कल्पना देखील केली नव्हती. अण्णाना रशियाचे फार आकर्षण होते; हे आकर्षण तिथे असणाऱ्या साम्यवादी चळवळीचे होते. कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंजल्स यांचा अण्णावर प्रभाव होता. या प्रभावाने त्यांना रशियात जाण्याचे स्वप्न पाहिले. अण्णा भाऊ हे रशियात जाण्याआधी त्यांचे साहित्य तेथे पोहचले होते. या सर्व विचारमंथनातून त्यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी झालेल्या स्टालिनग्राडच्या लढाईवर ‘स्तालिनग्राडचा पोवाडा’ लिहिला होता.
Mumbai : मुंबईकरांनो काळजी घ्या! पावसाळ्यात वाढले डेंग्यू, मलेरिया, लेप्टोचे रुग्ण
त्यांनाही एक रशियाला जाण्याची संधी मिळाली. रशियाला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे न्हवते, ही बातमी (Annabhau Sathe) महाराष्ट्रात पसरताच त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडला. आणि अण्णा थेट पोचले रशियात.
रशियात त्यांनी लोकांची जीवनशैली पाहिली. लोकांची शिस्त पाहिली. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर त्यांनी स्टेशनवर पाहिलेले स्वच्छ पोस्टर पाहून अण्णा म्हणतात, की ‘असं पोस्टर घाटकोपरच्या स्थानकावर लागलं असतं तर मीनाकुमारीला मिशा काढणाऱ्या आणि पृथ्वीराज कपूरच्या मिशा भादरणाऱ्या कलाकाराने काय केलं असतं?
त्यांचे रशियातील मॉस्कोमध्ये पहिले भाषण गाजले. ते त्यांनी इंग्रजी किंवा तेथील बोलीभाषेत केलं नसून मराठीत केलं आहे. ते आपल्या भाषणात म्हणतात, की “कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ असावी. परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे. त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात नि ती माणसं तुमच्यासारखीच नेक नि झुंजार आहेत. तुमचा अफानासी भारतात आला होता. पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर, महाराष्ट्र राज्यात, शिवाजी राजाच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राज्याच्या मराठीत मी बोलत आहे.” हा संपूर्ण प्रवास वाचनीय आहे. हा प्रवास अण्णा भाऊ यांनी आपल्या ‘माझा रशियातील प्रवास’ या पुस्तकात कैद केला आहे.
आज अण्णा भाऊ साठे यांची जयंती. अण्णा भाऊ यांनी केवळ महाराष्ट्रावर प्रेम केलं नाही तर ते प्रेम रशियासारख्या देशात केलेल्या मराठी भाषणातून झळकले. एका लहानशा गावातल्या या गरीब मुलाचे स्मृतीस्थान रशियात निर्माण होते; एका महाराष्ट्रातल्या या शाहिराची कीर्ती रशियात झळकते याहून मराठीसाठी मोठा अभिमान तो काय?