छत्रपती संभाजीनगर : देवगिरी किल्ल्यात स्वराज्याची (Chhatrapati Sambhajinagar) ठिणगी पडली याबाबत देशातली जनता अनभिज्ञ आहे ही फार मोठी शोकांतिका आहे; असे प्रतिपादन माहिती समितीचे महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यवाह राहुल भोसले यांनी केले. ते देवगिरी किल्ल्याजवळ संपन्न झालेल्या स्वराज्य प्रेरणा स्तंभाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
सुलतान निजामशहाने दौलताबाद किल्ल्यावर पौर्णिमेच्या दिवशी 25 जुलै 1629 रोजी मा. जिजाऊचे वडील लखुजीराजे दोन सख्खे भाऊ अचलोजी, रघुजी आणि एक भाचा यशवंतराव यांच्यावर बेसावध असतांना हल्ला केला आणि जिजाबाईचे माहेरचे कुटुंब एका क्षणात संपवले. दुसऱ्या दिवशी मा जिजाऊ यांच्या वडिलांना दोन भावांना आणि भाच्याला एकाच वेळी चिताग्नी दिला गेला. अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना म्हणजे मा जिजाऊ यांची आई गिरजाई आणि दोन भावजई या चितेसोबत सती गेल्या त्याही एकाच दिवशी!
एकाच दिवशी आई जिजाऊ यांच्या माहेरी सात चिता भडकल्या. ही बातमी शिवनेरीवर धडकली तेव्हा जिजाऊ दोन महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांच्या गर्भात बाळराजे शिवाजी. त्यांच्या मुठी या प्रचंड त्वेषाच्या, दुःखाच्या, निजामाच्या आणि मोगलाच्या नि:पाताच्या निर्धाराने गर्भसंस्काराने आवळल्या जात होत्या. जिजाऊचा तो आक्रोश, द्वेष, चीड हृदयात भडकलेली आग पूर्णतः गर्भात उतरली होती.
स्वराज्य निर्मितीचे ते स्फूलिंग होते. निर्धार होता प्रेरणा होती. हा इतिहास आणि ही प्रेरणा सतत तरुणांच्या मनामध्ये कायमस्वरूपी जागृत रहावी; म्हणून देवगिरी किल्ल्यावर पुढील वर्षभरात 440 फुटाचा स्वराज्य प्रेरणास्तंभ स्वराज्य तोरण समिती उभा करणार अशी माहिती समितीचे महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यवाह राहुल भोसले यांनी दिली.
Maharashtra : राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी व्यासपीठावर स्वामी विशुद्धानंद तीर्थ, देविदास महाराज, सुदर्शन महाराज कपाटे, श्रवण चैतन्य महाराज, खडक सिंघजी ग्रंथी, हभप जनार्दन महाराज मेटे चैतन्य महाकाली संस्थान देवगिरीचे महंत संघर्ष नाथ महाराज, संजय आप्पा बारगजे, पहिले सरसेनापती नेताजी पालकर यांचे वंशज विक्रमजी पालकर, छत्रपती शिवाजी महाराजांवर जळगाव येथे साहित्य संपन्न करणारे लेखक रवींद्र पाटील, संजय जी अडुळे, स्वराज्य तोरण कार्यक्रमाचे संयोजक मनीष पाटील, सहसंयोजक अशोक मुळे, सहसंयोजक शंकरराव जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या रॅलीत सुमारे सहाशे शिवभक्त सामील झाले होते. त्यानंतर आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या जाहीर कार्यक्रमात सहसंयोजक शंकर जाधव यांनी प्रास्ताविक केले.
श्रवण चैतन्य महाराज व ह.भ.प जनार्दन महाराज मेटे यांनी आपले विचार व्यक्त केले. संजय आप्पा बारगजे यांनी अध्यक्षीय समारोप केला. देवगिरी किल्ल्याचा खरा इतिहास समोर यावा यासाठी डॉक्टर रवींद्र पाटील लिखित ‘देवगिरी’ राहुल भोसले लिखित ‘स्वराज्य प्रेरणास्थळ किल्ले देवगिरी’ कॅप्टन निळकंठ केसरी लिखित ‘राजे लखुजी जाधवराव’ या तीनही पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक मनीष पाटील यांनी केले तर व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय (Chhatrapati Sambhajinagar) राजीव जहागिरदार यांनी करून दिला व आभार प्रदर्शन अशोक मुळे यांनी केले. कार्यक्रमासाठी परिसरातील आणि संभाजीनगर शहरातील किशोर शितोळे, काशिनाथ दापके, सुनील चावरे, नामदेव बोराडे, कमलेश कटारिया, अभिषेक कादी, नितीनजी उदमले, सुभाष मोकारिया, सुभाष कुमावत, विजयराव मुळे सह बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
देवगिरी किल्ला परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा कार्यक्रमाला गालबोट लागू नये किंवा वेगळे वळण लागू नये यासाठी आयुक्तालयातून 400 पोलीसांचा फौजफाटा, दंगल विरोधी केंद्रीय राखिव दलाचे 50 जवान, अग्निशामक दलाच्या दोन गाड्या, दंगल विरोधी वज्र वाहन असा बंदोबस्त लावलेला होता.