दादर : दुर्गराज रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी (Dadar) महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गेली 30 वर्षे साजरा केला जातो. हा सोहळा श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड तर्फे यशस्वीरित्या संपन्न होत आहे. या सोहळा यशस्वी करण्यासाठी जे मावळे कष्ट घेतात त्यांचा सन्मान सोहळा 28 जुलै रोजी दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी , ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांना ‘शिवसन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठी, ज्येष्ठ नाणी संकलक अशोक सिंह ठाकुर, कार्यवाहक राजेंद्र वराडकर, बरोडा संस्थांचे वंशज डॉक्टर हेमंत राजे गायकवाड, श्री राज्याभिषेक दिन उत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असिलता राजे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज (Dadar) रायगड या संस्थेतर्फे कार्य करणाऱ्या मावळ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आप्पा परब यांच्या ‘शिवराजाभिषेक’ पुस्तकाचे, डॉ. हेमंत राजे गायकवाड यांच्या ‘द ग्रेट शिवाजी फादर ऑफ नेव्ही’ या पुस्तकाचे तर शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडच्या इतिहास मंथनी या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यासोबतच विविध कार्यक्रमानी अतिशय देखणा असा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये समितीचे सदस्य वेदांत अडके आणि स्नेहल शिंदे यांनी शिवबावनीमधील काही छंद सादर केले तर मुद्रा मंगेश दामले या बालिकेने शिवपूर्व ते शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान केले. शिवप्रेमींनी त्यांची कला सादर केली तर समितीचे सदस्य विश्वास मेस्त्री यांनी वाघ्या मुरळी नृत्य सादर केले.
सोलापूर येथील अक्षय तळेकर यांच्या पथकाने स्वराज्य मर्दानी खेळ सादर केले. कुर्ला वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीर प्रवीण फणसे यांच्या कुटुंबानेही यावेळी शाहिरी केली. गोराई येथील आम्ही मावळे या संघाने ढोल ताशा वादनातून शिववंदना सादर केली. अशा रीतीने शिवभक्तांच्या उपस्थितीत सुंदर असा (Dadar) सोहळा संपन्न झाला.