हिंदकेसरी : हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व मानले जाते. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग…आषाढी आणि कार्तिकी विसरू नका असे स्वंय विठ्ठल सांगत आहे.. संतांमध्ये पांडुरंग या देवाला सर्वोच्च स्थान आहे. शेतकरी जसा उन्हाळ्यानंतर पावसाची वाट पाहतो त्यासोबतच पावसाच्या चाहुलीने आषाढीची देखील आस वारकऱ्यांना लागते. आणि मग सुरु होतो पायी वारीचा प्रवास.
देखोनिया पंढरपूर । जीवा आनंद अपार ।।
भाविकासाठी उभा । विठु कैवल्याचा गाभा ।।
विठ्ठल विठ्ठल म्हणत ऊन वारा आणि मुसळधार पाऊस मागे टाकत वारकरी मैलाचा प्रवास करतो तो केवळ पांडुरंगाच्या भेटीसाठी. आणि हा विठू देखील कंबरेवर हात ठेऊन आपल्या लाडक्या भक्ताला कवेत घेण्यासाठी आसुसलेला असतो. आषाढीच्या दिवशी केवळ वारकरीच गळाभेट घेत नाही; केवळ वारकऱ्याच्या डोळ्यातच आनंदाश्रू नसतात; तर भरल्या डोळ्याच्या कडेने सावळा देखील आपल्या भक्तांची गळाभेट घेतो आणि मग सफळ होते ती भोळ्या भाबड्या वारकऱ्याची भक्ती. तर असे आहे सुंदर, लोभस, सावळे रूप आषाढी एकादशीचे!
आषाढी सुरु केली ती ज्ञानोबा माऊलीच्या वडिलांनी. खांद्यावर भगवी पताका हातात टाळ मृदूंग आणि मुखी हरिनामाचा मधुर गजर करत पांडुरंगाला भेटायची परंपरा… या परंपरेचा वारसा सुरु ठेवला तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांनी वारीला दिलेल्या सरंक्षणानाने हि वारी आजतागायत अखंड सुरु आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जग जेव्हा कोरोना काळात थांबले होते त्यावेळी देखील भक्त-देवाचा संगम थांबला नाही; हेच आहे आपल्या वारकरी सांप्रदायाचे सौंदर्य.
आषाढी एकादशीपासून चातुर्मासही सुरू होतो. या एकादशीनंतर सर्व शुभ कार्ये बंद होतात. जे कार्तिकी एकादशी नंतर सुरु होतात. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. असे म्हंटले जाते या एकादशीला सर्व देवांचे तेज एकवटले जाते आणि त्यानंतर देव निद्रिस्त अवस्थेत जातात.
देवशयनी एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर पूजेचे ठिकाण स्वच्छ करून तेथे भगवान विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर भगवान विष्णूला पिवळे वस्त्र, पिवळे फूल आणि पिवळे चंदन अर्पण करून त्यांना सुपारी अर्पण करा आणि धूप, दिवा आणि फुले अर्पण करून त्यांची आरती करा. त्यानंतर या मंत्राने भगवान विष्णूची स्तुती करा… ‘सुप्ते त्वयि जगन्नाथ जमत्सुप्तम् भावेदिदम्। विबुद्धे त्वय बुद्धम् च जगत्सर्वा चराचरम्।’ अशा रीतीने भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. यानंतर स्वत: अन्न किंवा फळांचे सेवन करा.