सोशल मीडियावर चुकीची माहिती देणाऱ्या बातम्यांचे प्रमाण वाढले असून आयआरसीटीसीला (IRCTC) देखील याचा फटका बसला आहे. IRCTCच्या नावे एक माहिती प्रसारित होत असून हि माहिती खोटी असल्याचा दावा IRCTC ने केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या आडनावाच्या लोकांना तिकीट बुक करण्यास निर्बंध लावण्यात आल्याचा अहवाल प्रसारित करण्यात आला होता. हि माहिती संपूर्णपणे चुकीची असल्याचे आयआरसीटीसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
काय आहे खोटा अहवाल?
या अहवालात असा दावा करण्यात आला आहे, कि रेल्वे नियमपुस्तिकेअंतर्गत ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने केवळ त्यांच्या नातेवाईकांसाठी किंवा सारखे आडनाव असलेल्याच व्यक्तींचे तिकीट काढता येणार. अन्यथा, ग्राहकांना कलम 143 नुसार त्यांचे मित्र किंवा रक्ताने संबंधित नसलेल्या इतर व्यक्तींसाठी ऑनलाइन तिकिटे बुक करता येणार नाहीत. असे केल्यास 3 वर्षांचा दंड किंवा 10,000 रुपये दंड आकारला जाईल.
सदर अहवाल किंवा नियम हा खोटा असून आयआरसीटीसीने हा दावा फेटाळला आहे. तर असा कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही हे देखील स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी अशा नियमांना बळी न पडता आधी माहितीची चाचपणी करावी असे आवाहन देखील केले आहे.