Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाचा 25 वा वर्धापन दिन. भारताच्या इतिहासात सुवर्ण विजय मिळवणारा हा दिन. भारतीय लष्कराने 1999 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कारगिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेला महत्त्वाचा भाग लढून परत मिळवला होता. यामध्ये आपल्या सैनिकांना प्राणांची आहुती द्यावी लागली होती. या कारगिल युद्धात देशासाठी बलिदान दिलेल्या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या वर्षी देश या विजय दिनाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे, ज्याच्या स्मरणार्थ देशात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भारतीय जवानांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
कारगिलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमासाठी पीएम मोदी कारगिलला पोहोचले आहेत. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा यांनी रविवारी सचिवालयात बैठक घेतली आणि द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला पंतप्रधानांच्या भेटीच्या तयारीचा आढावा घेतला. यापूर्वी 2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती आणि कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला होता आणि 1999 मध्ये येथे प्राण गमावलेल्या लष्करी जवानांना श्रद्धांजली वाहिली होती.
कारगिल युद्धातील योद्धांबद्दल जाणून घ्या: Kargil Vijay Diwas
आजचा हा दिवस आपल्या शूर सैनिकांचे अपार प्रेम आणि बलिदान प्रतिबिंबित करतो. देशाच्या शूर जवानांनी आपल्या असामान्य शौर्याचे प्रदर्शन केले आणि आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी देशासाठी शहीद झाले. या निमित्ताने काही आपल्या या महानायकांची थोडक्यात माहिती घेऊया –
Paris Olympics : आजपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ; भारताचे ‘हे’ खेळाडू मारणार बाजी
कॅप्टन विक्रम बत्रा :
जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाची चर्चा होते तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. त्यांनी जखमी अवस्थेतही आपल्या संघाचे नेतृत्व केले आणि पॉइंट 4875 काबीज केला. यावेळी त्यांनी दिलेली ‘ये दिल मांगे मोर!’ ही घोषणा प्रसिद्ध झाली. त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र प्रदान करण्यात आला.
लेफ्टनंट मनोज कुमार पांडे (1/11 गोरखा रायफल्स)
लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांनीही कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या शौर्य आणि प्रेरणादायी नेतृत्वाची दखल घेऊन त्यांना भारत सरकारने मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले.
रायफलमन संजय कुमार (13 जेएके रायफल्स)
संजय कुमार यांनी पॉईंट 4875 काबीज करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जखमी अवस्थेत असूनही ते धैर्याने लढत राहिले. त्यांच्या अदम्य साहसाची दखल घेऊन त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते:
सुभेदार मेजर (ऑनररी लेफ्टनंट) योगेंद्र सिंह यादव, हे कारगिल युद्धावेळी केवळ 19 वर्षांचे होते. 04 जुलै 1999 रोजी त्यांनी स्वेच्छेने 18 ग्रेनेडियर्सच्या कमांडो प्लाटूनचे नेतृत्व केले. त्यांच्यावर टायगर हिलवरील तीन मोक्याचे बंकर काबीज करण्याचे काम सोपवले होते. यावेळी त्यांचे शौर्य संपूर्ण देशाने पाहिले. त्यांनी अंगावर 15 गोळ्या झेलूनही टायगर हिल ताब्यात घेतला. त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी, त्यांना देशाचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र प्रदान करण्यात आला. आपल्या अदम्य धैर्याने, त्यांनी 18 ग्रेनेडियर्स रेजिमेंटला टायगर हिलचा महत्त्वाचा भाग काबीज करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा सन्मान मिळवणारा ते सर्वात तरुण धाडसी सैनिक ठरले.
कॅप्टन अमोल कालिया
सैनिक बनायचे स्वप्न उराशी बांधून कॅप्टन अमोल कालिया यांनी भारतीय सैन्यात भाग घेतला. 1999 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान, कॅप्टन कालियाच्या टीमला पाकिस्तानी सैन्याकडून एक अतिशय महत्त्वाचे पर्वत शिखर परत घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. हे एक धोकादायक मिशन होते, परंतु कॅप्टन कालिया आणि त्याचे 13 साथीदार हे पर्वतीय युद्धात तज्ञ होते. ते रात्री माथ्यावर पोहोचले आणि शत्रूशी लढू लागले. कॅप्टन कालिया गंभीर जखमी झाले तरीही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढत दिली. कॅप्टन कालिया आणि त्याच्या टीमने आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु, पर्वत शिखर त्यांनी हातून घालवला नाही तर त्यावर विजय मिळवला.
तर असे हे आपले साहसी सैनिक. या महानायकांचा आपण कधीही विसर पडू द्यायचा नाही अशी प्रतिज्ञा घेऊन आपण आजचा 25 वा कारगिल विजय दिवस साजरा करूया.