लेखक सर्वेश फडणवीस – भारती ठाकूर हे नाव नाशिकसाठी (Navratri Day 1) ओळखीचे आहे कारण त्या मूळच्या नाशिकच्या आहेत. साहसाची आवड असल्यामुळे अनेक ट्रेकिंग, सायकलिंग अशा मोहिमा त्यांनी फत्ते केल्या आहे. काही काळ विवेकानंद केंद्राचे पूर्णकालीन काम करण्यासाठी त्या आसाममध्ये गेल्या आहेत. कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्रात वास्तव्य असताना भरपूर वाचन,चिंतन,मनन,अनेक विद्वत मंडळींशी चर्चा यातून मनात वेगळेच काही तयार होत होते. अशातच त्यांना नर्मदा परिक्रमेची इच्छा झाली आणि पुढे परिक्रमा सुरू झाली.
१४ ऑक्टोबर २००५ ते १२ मार्च २००६ या कालावधीत त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. ५ महिन्यांच्या या परिक्रमेत त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. केवळ निसर्गदर्शन,अध्यात्मिक अनुभव अशा गोष्टींचा विचार भारतीताईंच्या मनात नव्हता तर नर्मदेवर बांधल्या जाणाऱ्या धरणांमुळे लाखो वर्षांची प्राचीन परंपरा, नर्मदा खोऱ्यातील संस्कृती, वैविध्यपूर्ण जैविक संपदा धरणाखाली जाण्यापूर्वी डोळे भरून पहावी, त्याच्या नोंदी ठेवाव्यात या विचाराने त्यांनी परिक्रमा करण्याचे ठरवले. नर्मदा किनाऱ्यावरील लोकजीवन आणि नर्मदा माईच्या किनाऱ्यावरून मार्गक्रमण करताना स्वत:शीच संवाद साधावा हे कारण ही होतेच. त्यांनी अनुभवलेला निसर्ग,भेटलेली माणसं सारं काही टिपून ठेवले आणि तेच अनुभव पुस्तक रूपाने आपल्याला ‘नर्मदा परिक्रमा – एक अंतर्यात्रा’ ह्या त्यांच्या अंतर्मनाशी झालेल्या संवादात वाचायला मिळतात.
आपल्या परिक्रमेत त्यांना नर्मदा घाटीतल्या परिस्थितीची जाणीव झाली. नर्मदेच्या घाटात त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाविना झगडताना पाहिलं. अवघी पाच-सात वर्षांची ही मुलं घाटात फिरून फुलं विकायची, पैसे गोळा करायची, नारळ जमा करायची. हे सगळं वास्तव पाहून भारती ठाकूर यांना राहवलं नाही आणि त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली. पुढे त्यांनी स्वत:ला या कामात पूर्णवेळ वाहून घेतलं. नर्मदेच्या घाटात त्यांनी या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. सुरुवातीला हातावर मोजता येतील अशी मुलं या शाळेत होती, आता या शाळेत जवळजवळ १७०० हुन अधिक मुलं आहेत.
खरं सांगायचं तर हा शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. स्वत:च्या पेन्शनच्या पैशातून मंडलेश्वर येथे राहून रोजची दहा-बारा किलोमीटरची पायपीट करत आदिवासी मुले आणि महिलांसाठी त्यांनी कामाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनौपचारिक शिक्षण सुरू केले. सुरुवातीला त्यांनी एकटीने लढा दिला. मंडलेश्वर ते आजूबाजूच्या परिसरात, पाड्यांमध्ये जाऊन कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अत्यंत गरिबीमुळे व नैसर्गिक परिस्थितीमुळे ही मुले शेतातील कामे करणे, गुरे चरायला नेणे यासाठी कुटुंबात मदत करत असत. लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी पण या मुलांवर होतीच. त्यासाठी कुटुंबाचे मन वळवून या मुलांचा शिक्षणाकडे ओढा वाढावा यासाठी भारती ठाकूर ह्यांनी प्रयत्न केले. या सर्व निरपेक्ष भावनेतून चाललेल्या आणि नर्मदामैयाच्या आशिवार्दाने पुढे जाणाऱ्या कामातून एकेक माणूस जोडला जाऊ लागला. भारतीताई यांच्या प्रयत्नातून शाळेत आलेले विद्यार्थी त्यांना मदत करू लागले आणि या चळवळीला ‘नर्मदा’ या संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले. ऑक्टोबर २००२ मध्ये ‘नर्मदालय’ संस्थेची स्थापना झाली आणि प्राथमिक ते हायस्कूल आणि आज व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून निमार प्रदेशातील पंधरा खेड्यांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे.
आज नर्मदालयाचा प्रमुख उद्देश हा औपचारिक व अनौपचारिक शिक्षण,व्यवसायाभिमुख (Navratri Day 1) शिक्षण,आरोग्य आणि पर्यावरण या कामासाठी राहिला आहे. चांगल्या कामाला परमेश्वर पाठीशी असतोच इथं तर प्रत्यक्ष नर्मदा माई आहे. भारती ठाकूर ह्यांचे काम बघून एका नागा साधूने त्यांच्या आश्रमाची जागा व बाजूची जमीन नर्मदालय संस्थेला दिली. या जागेवर रामकृष्ण शारदा निकेतन सुरू आहे. औपचारिक शिक्षण व संस्कार याबरोबरच सुतारकाम, दुग्ध व्यवसाय, शेती, वेल्डिंग, माती परीक्षण याचे प्रशिक्षण देऊन हे विद्यार्थी ग्रामीण भागाशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले गेले आहे. केवळ या भागातील वंचित कुटुंबातील मुलांना या शाळेत प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन व शिक्षण हे संपूर्णत: विनामूल्य दिले जाते. विशेष म्हणजे रामकृष्ण शारदा निकेतन लेपा पुनर्वास ही मध्य प्रदेशातील पहिली डिजिटल शाळा बनली आहे. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग,डॉक्टर आदी पदवी प्राप्त करते झाले आहेत. या केंद्रांमध्ये शिक्षिका म्हणून अनेक ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला आहे. या शिक्षकांना देण्यात येणारे ट्रेनिंग त्यांना संपूर्ण आयुष्यासाठी प्रेरक ठरत आहे. या सर्व उपक्रमांसाठी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता देणगी स्वरूपात रक्कम गोळा करून हा खर्च भागवला जातो आहे.
नर्मदा संस्थेचा आणखी एक प्रकल्प म्हणजे ‘नचिकेत छात्रावास’. आजूबाजूच्या पाड्यांवरून शिक्षणासाठी येणारी मुले या छात्रावासात राहतात. लेपा पुनर्वास भागात शाळा व छात्रावासाच्या नजीकच एक गोशाळेचा उत्तम प्रकल्पही चालू आहे. नर्मदा संस्थेतर्फे या भागातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी ‘नर्मदा निर्मिती’ नावाने शिलाई विभाग सुरू करण्यात आला आहे. यातील तयार वस्तूंना विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. आज भारती ठाकूर ह्यांचा कार्याचा वटवृक्ष उत्तरोत्तर बहरतोय.भारती ठाकूर ह्यांच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा. कवी बा.भ.बोरकर ह्यांच्या ओळींच त्यांच्या कार्यासाठी यथार्थ ठरतील…
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ।।
✍️ सर्वेश फडणवीस