Hindakesari News : शिवछत्रपतींनी जो गडकोटांचा वारसा आपल्याला (Pen) दिलाय तो जपण्यासाठी हे आचरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून श्री सांकशी गडावर निरंतर गड संवर्धन मोहिमा होत आहेत. या मोहिमेच्या कार्याची पोचपावती म्हणून यंदा कार्य करताना 3 पुरातन मूर्त्या धारकऱ्यांना सापडल्या. या गड संवर्धन मोहिमेत पेण, पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातून देखील अनेक धारकरी, सेवेकरी गड संवर्धन मोहिमेत सहभागी होत असतात.

आज रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री सांकशी गडावरील 47 वी मोहीम राबवत असता, गडावरील पाण्याचे टाके साफ करत असताना पाण्याच्या टाक्यात श्री महादेवाची पिंड, भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्य बाण घेतलेली गड देवतेची मूर्ती अशा 3 पुरातन मूर्त्या टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना सापडल्या.

आजपर्यंत गडावर 46 संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून झाल्या आहेत. त्यामधे गडावरील दगड, माती, गाळ याने भरलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात धारकरी बंधूंना यश मिळाले आहे. पण आजची मोहीम ही झालेल्या सर्व गड संवर्धन मोहिमांचा आनंद द्विगुणित करणारी आणि सर्वांना शिवकाळात घेवून जाणारी मोहीम ठरली.

यापूर्वी श्री सांकशी गडावर कोणत्याही देव-देवतेची मूर्ती नसताना धारकरी गडावर गड संवर्धन कार्य चालू करण्यापूर्वी गड देवतेचे स्मरण (Pen) करुन गडाला नारळ, हार वाहून पूजा करत होते आणि प्रत्येक जण गडाच्या गड देवतेला साकडं घालत होते. गड संवर्धन कार्य करणाऱ्यांना शक्ती आपल्या कार्याला यश दे, तसेच ज्याप्रमाणे शिवकाळात, मागच्या काळात आपल्या मावळ्यांनी, पूर्वजांनी गडावर आपल्या देव-देवदेवतेची पूजा केली असेल ते भाग्य आम्हाला आजच्या काळात मिळू दे आम्हाला सुद्धा गडावरील देव-देवतांची सेवा करायची, पूजा करायचे भाग्य मिळू दे साक्षात आज सांकशी गडाच्या गड देवतेने आणि आपल्या भगवंतांनी श्री महादेवाच्या रुपात नंदी महाराजांच्या रुपात गड देवतेच्या रुपात दर्शन दिले.
गडावर सर्व देवतांचे अभिषेक घालून पूजा आणि आरती करुन भंडारा उधळून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला.