पुणे : महापुरुषांना लोकांनी जातीत वाटले असून त्यांच्या विचारांची (Pune) आपल्या आयुष्यात गरज आहे. तर लोकमान्य टिळक यांनी आपल्या मुलांना दिलेला संदेश हा आपल्याही आयुष्यात मोलाचा आहे; तो विचार आपण आंगिकारला पाहिजे असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडलचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार, लोकमान्य टिळकांचे चरित्रकार अरविंद गोखले यांना लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
लोकमान्य टिळक स्मृती प्रतिष्ठान तर्फे लोकमान्य टिळक यांचा जयंती सोहळा टिळकप्रेमींच्या उदंड प्रतिसादात 21 जुलै रोजी ऐतिहासिक केसरीवाड्याच्या लोकमान्य सभागृहामध्ये उत्साह व जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडलचे संचालक अविनाश धर्माधिकारी होते. तर व्यासपीठावर लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक, लोकमान्य टिळक स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आशिष जोशी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, अनिल गानू, व्याख्याते मोहन शेटे उपस्थित होते. यावेळी समाजकार्य करणाऱ्या पत्रकार नेहा जाधव – तांबे, वैभव पोदार, प्रसाद पाचपांडे, परिक्षीत कुलकर्णी या तरुणांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते मोहन शेटे यांचे ‘लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. रवींद्र खरे यांच्या सूत्रसंचालनाने (Pune) कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
तर, आज पुण्यात लोकमान्य टिळकांच्या नावे कोणतेही उड्डाणपूल अथवा वास्तु नाही; तसेच दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात त्यांचा पुतळाही नाही ही खंत लोकमान्य टिळक स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आशिष जोशी यांनी व्यक्त केली असून पुढल्या वर्षी पासून दहा ठिकाणी तरी लोकमान्य टिळकांचा जयंती उत्सव सुरू करण्याचा संकल्प केला.
यावेळी आशीष जोशी यांच्या खंताची दखल घेत लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांनी यापुढे टिळकांच्या सन्मानासाठी जमेल तितके कार्य करेन अशी ग्वाही दिली. गीता उपासनी यांनी आभार मानले तर मानसी दीक्षित यांच्या मधुर आवाजात पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.