पुणे : गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ स्पर्धा पार (Pune) पडल्या. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कर्देचा प्रथम क्रमांक आला आणि या जिल्हा परिषद शाळेस 11 लाखांचे बक्षीस मिळाले. ही शाळा एक उपक्रमशील आणि आदर्श शाळा म्हणून गणली जाते. या शाळेच्या पुढील विकासाचे ध्येय समोर ठेवून आपल्या शाळेत अजून काही चांगले करण्याचा संकल्प उराशी बाळगून या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांनी पुणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी, वाबळेवाडी आणि जालिंदरनगर या तीन शाळांना भेटी दिल्या.
विठ्ठलवाडी ही एक गावकऱ्यांच्या सहकार्यातून एका उजाड माळरानावर उभी राहिलेली एक आदर्श शाळा म्हणून महाराष्ट्रभर ओळखली जाते. या शाळेतील शिक्षक युवराज घोगरे यांच्या संकल्पनेला गावकऱ्यांच्या सहकार्यातून एक मुर्त स्वरूप आले आहे. निसर्गसंपन्न अशा वातावरणाने ही शाळा नटली आहे.
दत्तात्रय वारे यांची वाबळेवाडी शाळा ही महाराष्ट्राला दिशादर्शक अशी शाळा ठरली आहे. लाखो शिक्षणप्रेमींनी आतापर्यंत या शाळेपासून प्रेरणा घेतली आहे. या शाळेतून बदली झाल्यानंतर वारे सरांनी एका वर्षातच जालिंदरनगर ही शाळा आदर्श घडवली.गेल्या वर्षी या शाळेत पुणे जिल्हा परिषदेने आदर्श शाळेस दिला जाणारा अध्यक्ष चषक देऊन गौरविले आहे.
या अभ्यास दौऱ्यात दत्तात्रय वारे आणि युवराज घोगरे यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या आणि (Pune) विद्यार्थ्यांच्या विकासासाठी यथायोग्य चर्चा या वेळी करण्यात आली. गोवा राज्याचे माजी पर्यावरण शिक्षण संचालक जयराम रेडकर यांनी नुकतीच या तीन शाळांना भेट दिली होती आणि महाराष्ट्रभरातील शिक्षणप्रेमींना या तीन शाळा पाहण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनानुसार कर्दे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रुके, सदस्य सुशील मळेकर, सुरेंद्र माने, मंगेश मळेकर रूपेश नागवेकर, शिक्षक अनिलकुमार मळगे, सुशांत केळसकर, जयंत देवघरकर, स्वप्निल परकाळे हे या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले.