मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain Update ) मुंबईसह कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्याला झोडपले आहे. आज सकाळपासून देखील पावसाची बॅटिंग सुरूच आहे. पावसाचा वाढता जोर पाहता, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, रायगड आणि पालघर जिल्ह्यात 204 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, पूर्व उपनगरात सर्वाधिक पाऊस सरासरी 44.54 मिमी, त्यानंतर पश्चिम उपनगरात 41.39 मिमी आणि बेट शहर विभागात 26 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळच्या दरम्यान, शहराला मध्यम स्वरूपाच्या पावसाने दिलासा मिळाला, ज्यामध्ये IMD च्या सांताक्रूझ स्टेशनवर 46 मिमी पाऊस झाला आणि कुलाबा वेधशाळेत 38 मिमी पाऊस पडला.
तर लोणावळा येथे गेल्या 9 तासात 145 मिलिमीटर इतका रेकॉर्डब्रेक पाऊस पडला आहे. यासाठी लोणावळ्यातील शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता राजाराम बंधाऱ्यावर 42.5 इंचावर पंचगंगेची (Rain Update ) पाणीपातळी पोहोचली आहे.