‘Hindakesari News : आभासकडून प्रत्यक्षाकडे अशी संकल्पना सादर करत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेतर्फे दि. ३० एप्रिल – १ मे, २०२५ रोजी ‘समाज माध्यम साहित्य संमेलन’चे आयोजन करण्यात आले. भायंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे हे संमेलन पार पडले. या संमेलनात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा १५ जिल्ह्यातील ८० हून अधिक सदस्य आणि विशेष निमंत्रकांनी सहभाग नोंदवला. समाज माध्यमांवर विपुल प्रमाणात लेखन करणारे आणि आभासी माध्यमातून परस्परांच्या संपर्कात असणारे समाज माध्यमांवरील लेखक प्रत्यक्षात एकत्रित येऊन वैचारिक देवाणघेवाण घडावी, हे प्रबोधिनीचे संमेलन योजण्यामागचे उद्दिष्ट होते.
म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. लेखक-उद्योजक ओंकार दाभाडकर हे या कार्यक्रमाचे समन्वयक होते. संमेलनामध्ये अभिव्यक्ती : मुक्त आणि स्वैर : समाज माध्यमावरील धुसर रेषा, आणि फॉलोवर्स वाढत गेले, आकांक्षा स्व-उत्कर्षाची, समाजमन घडताना आणि घडविताना अशी सत्र तर ‘गोष्ट इथे संपत नाही..’ हा प्रयोग सादर करण्यात आला.
हे संमेलन म्हणजे उत्कटतेचा उत्सव आहेच, तथापि समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी. तसेच समाज माध्यमीय साहित्य-व्यवहाराचा विधायकतेकडेही प्रवास व्हावा – डॉ. विनय सहस्रबुद्धे
ज्येष्ठ लेखक अभिजित जोग, श्रीकांत उमरीकर, ज्येष्ठ लेखक रवींद्र (राजाभाऊ) मुळे, रविकुमार सुभाषराव, लेखक-उद्योजक ओंकार दाभाडकर, अधिवक्ता सौरभ गणपत्ये, डॉ. चेतन दीक्षित, गीतकार आणि व्याख्याते विक्रम एडके, Booklet Guy अमृत देशमुख, सावरकर अभ्यासक अक्षय जोग, विवेक विचार मंचचे भरत अमदापुरे यांनी वरील सत्राद्वारे श्रोत्यांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. तर कार्यक्रमाचा समारोप सुप्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर यांच्या मार्गदर्शाने संपन्न झाला.