हिंदकेसरी न्यूज : टाटा समूहाचे कुलगुरू रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले. संपूर्ण विश्वात रतन टाटा यांना मानाचे आणि आदराचे स्थान आहे. त्यांच्या निधनाने सर्व समाजात शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कामगिरीचा संपूर्ण जगाला हेवा वाटतो. त्यांनी आपले पंख केवळ भारतात नाहीतर विश्वभरात पसरले. त्यांच्या सारख्या हरहुन्नरी माणसाच्या यशाची आणि कामगिरीची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे फोर्डसारख्या परदेशी बहुराष्ट्रीय कंपनीकडून त्यांनी झालेल्या अपमानाचा पुरेपूर बदला घेतला होता. ही कथा रोमांचकारी आहे. त्यांच्या आठवणीत जाणून घेऊया नेमके काय घडले होते?
टाटा मोटर्सने जून 2008 मध्ये फोर्डकडून दोन लक्झरी कार ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हर खरेदी केले होते. काही वर्षांपूर्वी बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष वेदांत बिर्ला यांनी ट्विटरवर एक कथा सांगितली होती. ती कथा रतन टाटा यांनी फोर्डविरुद्ध घेतलेल्या सूडाची कथा होती. त्यांच्या मते ही घटना 1998 साली घडली होती. त्यानंतर टाटा मोटर्सने भारतातील पहिली स्वदेशी कार टाटा इंडिका लाँच केली. टाटा इंडिका हा रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मात्र, या गाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले. कमी कार विक्रीमुळे टाटा मोटर्सला वर्षभरात आपला कार व्यवसाय विकायचा होता. यासाठी टाटांनी 1999 मध्ये अमेरिकेतील मोठ्या कार उत्पादक कंपनी फोर्डशी बोलण्याचा निर्णय घेतला.
हा करार अंतिम करण्यासाठी रतन टाटा त्यांच्या टीमसह बिल फोर्ड यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले. बिल फोर्ड त्यावेळी फोर्डचे अध्यक्ष होते. दोन्ही कंपन्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीदरम्यान बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचा एक प्रकारे “अपमान” केला होता. बिल यांनी रतन टाटा यांना सांगितले की, त्यांनी कारच्या व्यवसायात कधीही उतरू नये. असे म्हटले जाते की, बिल फोर्ड यांनी विचारले होते की तुम्ही प्रवासी कार विभाग का सुरू केला? आपल्याला याबद्दल पूर्णपणे काहीही माहिती नाही. ते म्हणाले की जर मी हा करार केला तर (Ratan Tata) मी तुमच्यावर उपकार करेन. यानंतर दोन्ही कंपन्यांमधील चर्चा तुटली. या संदर्भात पुढे कोणताही करार झाला नाही. यानंतर रतन टाटा यांनी इंडिकाचे उत्पादन युनिट न विकण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर जे घडले ते व्यवसायाच्या जगातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक आहे. केवळ 9 वर्षांनंतर टाटांसाठी परिस्थिती बदलली होती. तर, 2008 च्या मंदीनंतर फोर्ड दिवाळखोरीच्या मार्गावर होती. यानंतर रतन टाटा यांनी फोर्ड पोर्टफोलिओचे दोन लोकप्रिय ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करण्याची ऑफर दिली होती. जून 2008 मध्ये टाटाने फोर्डकडून जग्वार आणि लँड रोव्हर $2.3 बिलियनमध्ये खरेदी केले. फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी टाटांचे आभार मानले आणि त्यांना खरेदी करून तुम्ही आमच्यावर मोठे उपकार करत असल्याचे सांगितले. यानंतर टाटांनी जेएलआरचा व्यवसाय नफ्यात बदलला.
अशा प्रकारे टाटा यांनी ज्या फोर्डने मी उपकार करेन असे उद्गार काढले त्याच फोर्डचे ब्रॅंड घेऊन खुद्द त्याच्यावरच उपकार केले. रतन टाटा हे उद्योगक्षेत्रातील एक बहुमूल्य रत्न होते. त्यांच्या अशा अनेक कामगिरीमधून ते आदर्श म्हणून भारतीयांच्या मनात कायम जीवंत राहतील.